टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्रींची पुन्हा नियुक्ती


नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला असून 3 वर्षांपूर्वी सायरस मिस्त्री यांची या पदावरून हकालपट्टी झाली होती. त्यांनी त्याविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादात याचिका दाखल केली होती. सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय या लवादाने बेकायदेशीर ठरवला आहे. सायरस मिस्त्री यांच्या जागी एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे.

टाटा सन्सचे सायरस मिस्त्री हे सहावे चेअरमन होते. काही नाट्यमय घडामोडींनंतर 2016 साली या पदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले. रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर चेअरमन झालेले सायरस मिस्त्री यांनी 2012 ते 2016 अशी 4 वर्षं कार्यभार सांभाळला. त्यांच्यानंतर टाटा कन्स्लटन्सीचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा सन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आपल्या हकालपट्टीला सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादाकडे सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इनव्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्यांच्या माध्मयातून दाद मागितली. कंपनीच्या कायद्यानुसार सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय नसल्याचे या कंपन्यांचे म्हणणं होते. पण हे दावे 2018 मध्ये राष्ट्रीय कंपनी लवादाने फेटाळून लावले. त्यानंतर या निर्णयाविरोधात सायरस मिस्त्री यांनी पुन्हा अपील केले. आता सायरस मिस्त्री यांना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती पुन्हा करण्यात यावी, असे आदेश लवादाने दिले आहेत.

Leave a Comment