नितीश कुमारांची पंतप्रधानांकडे पॉर्न साईट्स बंद करण्याची मागणी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पॉर्न साईट्सच बलात्कारासारख्या घटनांसाठी जबाबदार असल्याचे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते.

देशभरात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर जनसामान्यांमध्ये अशाप्रकारच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात रोष पसरत आहे. अशा प्रकारच्या घटना अनेक राज्यांमध्ये घडत आहेत. हे अत्यंत दु:खदायक असून हा चिंतेचा विषय आहे. आजकाल मुलांची मोठ्या प्रमाणात इंटरनेटपर्यंत पोहोच वाढली असल्यामुळे मुले आणि युवक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अश्लिल मजकुर तसेच हिंसक गोष्टी पाहत आहेत. अशा घटना त्याच्याच प्रभावामुळे घडत असतात, असल्याचे नितीन कुमार यांनी पत्रात नमूद केले आहे.

अनेक घटनांमध्ये त्या घटनेचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर व्हायरल देखील करण्यात येतात. विशेषत: अल्पवयीन किंवा युवकांवर अशा प्रकारच्या मजकुराचा परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. अनेकांच्या मानसिकतेवर अशा प्रकारच्या डेटामुळे परिणाम होतो. तसेच महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यामध्ये यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीही महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांसाठी पॉर्न साईटस जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईटसवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली होती.

Leave a Comment