आयपीएस अधिकाऱ्याने ‘कायदेतज्ज्ञ’ जावेद अख्तर यांना झापले


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी निदर्शने, मोर्चे काढून पोलीस कारवाईच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. काही सेलिब्रिटीजनेही याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील या कारवाईला विरोध केला आहे. पण या प्रकरणाबद्दल लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी नोंदवलेल्या मतावरुन त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने चांगलेच झापले आहे. सध्या या दोघांच्या संवादाचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या निदर्शनांच्या वृत्तांकनादरम्यान आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर गैरवर्तवणुक केल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला होता. एका व्यक्तीने या व्हिडिओखाली जावेद अख्तर यांच्याबरोबर इतर काही जणांना टॅग केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर जामियाचे विद्यार्थी हल्ला करत आहेत. हे विद्यार्थी त्या प्रसारमाध्यमांवर हल्ला करत आहेत जे त्यांना त्यांच्या शांततापूर्ण म्हटल्या जाणाऱ्या आंदोलनाचे खरे चित्र दाखवत आहेत. पण या गोष्टीवरुन देशद्रोही आणि सेक्युलर लोक टीका करणार नाही. हा शहरी दहशतवाद असल्याचे या व्यक्तीने ट्विटमध्ये म्हटले होते.


जावेद अख्तर यांनी या ट्विटला उत्तर देताना विद्यापिठांमध्ये घुसखोरी करण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे ट्विट केले. पोलिसांना देशातील कायद्यानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही विद्यापिठामध्ये तेथील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आत जाता येत नाही. कोणत्याही परवानगीशिवाय जामिया विद्यापिठाच्या आवारामध्ये घुसखोरी करुन पोलिसांनी असा आदर्श तयार केला असल्यामुळे आता प्रत्येक विद्यापिठाला हा धोका असल्याचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.


आयपीएस अधिकारी असणाऱ्या संदीप मित्तल यांनी जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर उत्तर दिले. अख्तर यांना त्यांनी ट्विटवरुनच ‘कायदेतज्ज्ञ’ असा उपहासात्मक टोला लगावला आहे. प्रिय कायदेतज्ज्ञ, आम्हाला देशाचा कायदा समजवून सांगा. तुम्ही हे कोणत्या अनुच्छेदामध्ये आणि कोणत्या अधिनियमामध्ये म्हटले आहे ते आम्हाला देखील सांगा म्हणजे आम्हालाही हे ज्ञान प्राप्त होईल, असा टोला संदिप यांनी लगावला आहे. अनेकांनी या ट्विटला लाईक आणि रिट्विट केले आहे.

Leave a Comment