महाराष्ट्रातही बलात्काऱ्याला मिळू शकते १०० दिवसांत फाशी


नागपुर – हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडानंतर आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार विरोधात केलेल्या कायद्यानंतर आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातही बलात्काराच्या आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी असा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकते यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहवाल आणि मसुदा मागवल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बलात्काराचे प्रमाण देशात वाढत चालले आहे. देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कठोर कायदा प्रत्येक राज्यात लागू झाला पाहिजे. हा कडक कायदा अंमलात आणावा अशी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे.

सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुर येथे सुरु आहे. जलद कामगिरी केली तर या अधिवेशनातही विधेयक संमत केले जाऊ शकते असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. विधेयकाला मंजुरी दिली तर महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरेल असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Leave a Comment