संगीतकार बीथोवनचे अपूर्ण काम एआयच्या मदतीने पूर्ण होणार


जर्मनीचा महान संगीतकार बीथोवन याचे चाहते जगात मोठ्या संख्येने आहेत. या महान संगीतकाराची २५० वी जयंती साजरी करण्याची तयारी जर्मनीत सुरु असून या निमित्ताने बीथोवनचा अनोखा सन्मान केला जाणार आहे. बीथोवनच्या शेवटच्या काही धून (१० वी सिम्फनी) अपुऱ्या राहिल्या होत्या त्या त्याच्या डायरीत नोंदल्या गेलेल्या आहेत. या धून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पूर्ण केल्या जाणार आहेत. म्हणजे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

यासाठी नामवंत संगीतकार आणि प्रोग्रामरची एक टीम काम करत आहे. त्यासाठी खास सोफ्टवेअर तयार केले गेले आहे. हे सोफ्टवेअर संबंधित धून तयार करताना बीथोवनच्या मनात कोणते विचार होते हे ओळखू शकेल. बीथोवेन अर्काईव्हज प्रमुख क्रिस्टीन सीगार्ट म्हणाल्या, आम्ही संगणकाची मदतही घेत आहोत. बीथोवेन यांनी नेहमीच हटके आणि अतिशय मधुर असे संगीत दिले. त्यांच्या धून कुणालाही भुरळ घालेल अश्या असत. त्यांची नववी सिम्फनी ओड टू जॉय फारच गाजली आणि आजही ती तितकीच ऐकली जाते. त्याचवेळी ते १० व्या सिम्फनीवर काम करत होते मात्र ते अपुरे राहिले आणि अवघ्या ५७ व्या वर्षी बीथोवन यांचा मृत्यू झाला.

जर्मनीच्या बॉन शहरात १७७० मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पुढील वर्षात म्हणजे २०२० मध्ये त्यांची २५० वी जयंती आहे. त्याकाळी प्रभावशाली संगीतकार असा त्यांचा लौकिक होता आणि तोच आजही कायम आहे. बीथोवन उत्तम पियानोवादक आणि कंपोझर होता. वरील प्रकल्पासाठी जर्मन डॉयश टेलिकॉम स्पॉन्सरर आहे.

Leave a Comment