मनोहर पर्रीकरांची जीवनगाथा पडद्यावर येणार


गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि कॅन्सरला अकाली बळी पडलेले लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर चित्रपट बनविला जात आहे. बॉलीवूड प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिवशी, पुढील वर्षात १३ डिसेंबरला रिलीज होणार असल्याचे समजते. या चित्रपटासाठी निर्माते स्वप्नील शेतकर यांनी मनोहर पर्रीकर याचा मुलगा उत्पल यांच्याबरोबर चर्चा करून चित्रपटाचे हक्क मिळविले आहेत असे समजते.

आजकाल राजकीय नेत्याच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनविले जात आहेत. बॉलीवूड मध्ये अश्या चित्रपटांची जणू लाट आली आहे. प्रथम डॉ. मनमोहनसिंग, त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी याच्यावर चित्रपट आले आहेत आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरचा चित्रपट येऊ घातला आहे. त्यात कंगना रानौत मुख्य भूमिकेत आहे. मनोहर पर्रीकर यांची भूमिका कोण करणार हे अद्याप जाहीर केले गेलेले नाही. हा चित्रपट हिंदी आणि कोंकणी अश्या दोन भाषात बनविला जाणार आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या जीवनात त्यांना मिळालेले यश, करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या संबंधातील वादविवाद दाखविले जातील. २००० साली ते प्रथम गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते त्यापूर्वीच्या घटनाही चित्रपटात दिसणार आहेत कारण त्याविषयी लोकांना फार माहिती नाही. पर्रीकर यांची जनमानसात अतिशय हुशार, प्रामाणिक आणि सडेतोड नेता म्हणून प्रतिमा आहे.

Leave a Comment