डिसेंबरअखेर पूर्णपणे स्पष्ट होईल राज्य मंत्रिमंडळाचे चित्र


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खाते वाटपावर आज पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे भाष्य केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, सध्याचे मंत्रिमंडळ हे काही काळापुरते असून राज्य मंत्रिमंडळाचे पूर्ण चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होईल. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावले टाकली जात असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले. पण यात त्यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. अधिवेशनादरम्यान हे सात मंत्री कारभार करु शकतात. पण राज्याचा कारभार सात मंत्री पाहू शकत नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कुणाकुणाला मंत्रिमंडळात द्यायचे, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बैठक घेऊन करतील. काही काळापुरते सध्याचे मंत्रिमंडळ हे असून मंत्रिमंडळाचे पूर्ण चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होईल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेले नेते आपल्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अजित पवार त्यावर बोलताना म्हणाले, पक्षांतर केलेले प्रत्येकजण चाचपणी करत असतील. भाजपचे सरकार पुन्हा येईल अशी हवा तयार करण्यात आली होती. पण जनतेने काय कौल दिला हे राज्याने पाहिले. पण पक्षांतर करुन गेलेल्या नेत्यांपैकी कुणी याबद्दल मला विचारले नाही. ज्यांना विचारणा केली असेल ते याबद्दल बोलत असतील, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सध्या भाजपमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचा हा अंतर्गत वाद असल्यामुळे तेच तो सोडवतील, असे अजित पवार म्हणाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या साक्षीने गोपीनाथगडावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली असल्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्हाला जनतेने जबाबदारी दिली आहे. आमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहे, त्याची पूर्तता कशी करता येईल, याकडे आमचे लक्ष असल्याचे अजित पवांरांनी सांगितले.

विधिमंडळात कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जातो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावले देखील उचलली जात आहेत. शेतकरी सध्या अडचणीत आहे, यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ठोस असा निर्णय घ्यावाच लागेल. कर्जमाफीचा कितपत भार राज्य सरकार पेलू शकते, याबाबत अभ्यास सुरु आहे, त्यानंतर सर्व प्रमुख नेते याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Leave a Comment