गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट


मुंबई – आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून त्यानिमित्त समर्थकांचा मेळावा बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वाभिमान दिवस असे नाव देण्यात आले असून पंकजा मुंडे यांच्यासहित भाजप, शिवसेनामधील अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ट्विटच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले आहे.


धनंजय मुंडे यांनी ट्विट करत, आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हटले आहे.


औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ही माहिती ट्विटच्या माध्यमातूनच त्यांनी दिली होती. त्यांनी लिहिले होते की, उद्या शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी सबंध आयुष्य परिश्रम करणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

Leave a Comment