मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राटांचे नाव


मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला होता.

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले असून समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तेव्हाच महामार्गाच्या नामांतरावरुन युतीत वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली होती.

बाळासाहेब ठाकरेंनी देशातील पहिल्या वहिल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. पण वाजपेयींचे नाव देण्याची घोषणा झाल्यामुळे आता दबावाचे राजकारण नको, अशी तंबी फडणवीसांनी दिल्याचे म्हटले गेले आहे.

तीन वर्षांत जवळपास 56 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग’ पुर्णत्वास नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.

Leave a Comment