‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’चा मराठी ट्रेलर रिलीज


हिंदीसोबतच आता मराठीतही तान्हाजी मालूसरे यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा हिंदी ट्रेलर मागील महिन्यात रिलीज करण्यात आल्यानंतर हा चित्रपट मराठीतदेखील रिलीज व्हावा अशी मागणी होऊ लागली होती. सिनेरसिकांच्या आग्रहाखातर अभिनेता अजय देवगणने चित्रपट मराठीत रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मराठी चित्रपटाचा 15 सेकंदाचा टीजर काल रिलीज केल्यानंतर आज चित्रपटाचा 3 मिनिटे 18 सेकंदांचा ट्रेलर अजय देवगणने प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.


आपल्या इन्स्टाग्रामवर ट्रेलरची लिंक शेअर करुन अजय देवगणने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आला तुमच्या भेटीला, असे कॅप्शन दिले आहे.

अजय देवगण अलीकडेच मराठीत चित्रपट रिलीज करण्याबाबत म्हणाला होता, हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत एका शूर मराठा योद्ध्याची कथा प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, मी हे माझे भाग्यच समजतो. संपूर्ण देशासमोर ज्या पद्धतीने इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.

अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. मराठी अभिनेता देवदत्त नागेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत चित्रपटात झळकणार आहे. हिंदी आणि मराठी भाषेत एकाच दिवशी पुढील वर्षी 10 जानेवारी 2020ला हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment