भाजपमध्ये गेलेले अनेक नेते घरवापसीसाठी उत्सुक – जयंत पाटील


सांगली – भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेते घरवापसीसाठी उत्सुक असून त्यांनी आमच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी २०२४ मध्ये राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, त्यासाठी प्रयत्न करु असेही यावेळी त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांचा सांगलीमधील इस्लामपूर येथे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

त्यांनी यावेळी बोलताना राजकारणात बेरजेचे राजकारण फार महत्त्वाचे असल्याचे म्हटले. बेरजेचे राजकारण माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुरु केल्याचेही यावेळी ते म्हणाले. सत्तास्थापन करण्यापुर्वी जयंत पाटील यांनी झालेल्या राजकीय घडमोडींवर बोलताना, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर एवढे मोठे राजकारण घडल्याचे सांगितले.

पण सत्तेपासून भाजपला दूर ठेवावे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र यावे हेच जनतेच्या मनात असल्यामुळेच तशा राजकीय घडामोडी घडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हते, आणि नेमके तसेच घडले. पण २०२४ मध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा प्रयत्न करु असा निर्धार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. जयंत पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना त्यासाठी राज्याच्या तिजोरीची स्थिती तपासावी लागणार आहे, थोडा वेळ त्यासाठी द्यावा लागेल असे सांगत, आम्ही लवकरच त्यासंबंधी निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment