आहारामध्ये साखर खाणे गरजेचे आहे का?


आपल्या आहारामध्ये आपण सेवन करीत असलेल्या चहा, कॉफी किंवा इतर गोडधोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण हा आहारतज्ञांचा अगदी आवडता विषय असतो. आताच्या बदलत्या खानपानाच्या सवयींमुळे, आपण ही आपल्या आहारामधील साखरेच्या प्रमाणाबद्दल अधिकच जागरूक झालेले आहोत. सध्या वाढीला लागलेल्या मधुमेह, स्थूलपणा, रक्तदाब या विकारांना पाहता ते योग्य ही आहे. पण साखर आपल्याला वाटते तशी आरोग्याच्या बाबतीतली ‘खलनायिका ‘ खरोखरच आहे का? जागतिक आरोग्य परिषदेने ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) एका दिवसामध्ये सहा ते आठ लहान चमचे साखर खाणे योग्य आहे असे म्हटले आहे. आपले आहारतज्ञ जितकी साखर खाण्याचा सल्ला आपल्याला देतात, त्यापेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे नक्की साखर खावी का, आणि किती खावी, याचा विचार होणे अगत्याचे आहे.

साखर ही अनेक निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपण नित्य वापरत असलेली रिफाईन्ड साखर असते, कृत्रिम स्वीटनर्स असतात, आणि फळे व भाज्यांमधून मिळणारी फ्रुक्टोज व ग्लुकोज सारखी नैसर्गिक शर्काराही असते. कृत्रिम स्वीटनर्स मध्ये स्टेविया, सॅखरीन, सुक्रोज, आणि अॅस्पारटेम ह्यांचा समावेश आहे. ही सर्व स्वीटनर्स ‘ शुगर फ्री ‘ असून आपल्या आहारामध्ये साखरेऐवजी वापरावयाची असतात. फळे आणि भाज्यांमधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण दर भाजी किंवा फळामध्ये वेगवेगळे असते. पण ही नैसर्गिक साखर आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगली समजली जाते.

भारतामध्ये बहुतेक ठिकाणी उसाच्या रसापासून तयार केलेली साखर वापरण्यात येते. त्यामुळे ही साखर योग्य प्रमाणात सेवन केली गेल्यास तितकी अपायकारक नाही. पण प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड अन्नपदार्थांमध्ये असलेली साखर कॉर्न सिरप सारख्या पदार्थांपासून तयार केली जाते. त्यामुळे अश्या अन्नपदार्थांचे सेवन शक्यतो टाळणे उत्तम. आपल्या आहारामध्ये साखर खाण्याची गरजच नाही असे काही आहारतज्ञांचे मत आहे. आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमधून आपल्याला मिळत असलेले स्टार्च, प्रथिने आणि फॅट्स आपल्या शरीरामध्ये ग्लूकोज तयार करीत असतात. तसेच प्रत्येकाने फायबर व कॉम्प्लेक्स कर्बोदके असलेला संतुलित आहार घेतला पाहिजे असे आहारतज्ञांचे मत आहे.

सुप्रसिद्ध आहार तज्ञ ऋजुता दिवेकर ही, साखर आपल्या आरोग्यास हानिकारक नसून, ती ज्या पद्धतीने खाल्ली जाते, त्या पद्धती आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगतात. साखर ही ‘ पंच अमृतां ‘ पैकी एक असून याचे सेवन फार प्राचीन काळापासून आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र सध्या प्रोसेस्ड अन्नपदार्थ, पॅकेज्ड ज्यूस, योगर्ट, बेकरी उत्पादने यांच्या मार्फत जी साखर सतत खाल्ली जाते, ती पद्धत अपायकारक असल्याचे ऋजुता म्हणतात. आताच्या काळात साखरेच्या अतिसेवनाने उद्भविणाऱ्या आजारांमध्ये स्थूलपणा, मधुमेह असे विकार सर्रास दिसून येत असतात. त्याचबरोबर प्रमाणाबाहेर साखर आहारात असल्याने शरीराची मेटाबोलिझम शिथिल होते, अगदी क्वचित प्रसंगी लिव्हर खराब होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण साखरेचे प्रमाण किती ठेवायचे हा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यायला हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment