मराठी आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली टीम करणार हैदराबाद एनकाऊंटरची चौकशी


हैदराबाद : हैदराबाद पोलिसांनी केलेल्या डॉक्टर तरुणीच्या अत्याचारातील आरोपींच्या एनकाऊंटरची चौकशी करण्यासाठी तेलंगणा सरकारने 8 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे. न्यायालयात या हैदराबाद एनकाऊंटरविरोधात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी मानव हक्क आयोगाने देखील चौकशी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील अखेर एसआयटीची नेमणूक करत एनकाऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले.

महेश भागवत या एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे या टीमचे नेतृत्व करणार आहेत. भागवत रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या काम करत आहेत. एनकाऊंटरचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचे महत्त्वाचे काम या टीमकडे असणार आहे.

तेलंगणा उच्च न्यायालयात आरोपींच्या एनकाऊंटर प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. याआधीच हैदराबाद एनकाऊंटरमधील आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होऊपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. आज रात्री 8 वाजता ही वेळ संपेल. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय पुढील काय दिशानिर्देश देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Comment