तीन महिन्यांपूर्वीच केंद्राला दिले होते कांद्याच्या दरवाढीचे संकेत


मुंबई – देशात कांद्याचा वांदा झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. त्यातच संसदेसह देशभरात सध्या कांद्याच्या दरवाढीवरून गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्यावर प्रथमच भाष्य केले आहे. केंद्र सरकार कांद्याच्या दरवाढीला जबाबदार असून दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीतून कांदा आयात करण्यात आला. ही चूक केंद्र सरकार करत असल्याचा सूचक सल्ला देत पवारांनी कांद्याच्या दरवाढीच्या कारणांचाही उलगडा केला.

नुकतीच दि इंडियन एक्स्प्रेस दैनिकाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलाखत दिली. शरद पवार यांनी या मुलाखतीत राज्यातील सत्तांतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेसह कांद्याची दरवाढ याविषयी संवाद साधला. सध्या देशभरात देशातील कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा चर्चेत आहेत. या मुद्यावरुन संसदेत देखील बराच गोंधळ झाला. शरद पवार यांनी या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाववाढीच्या कारणाचा खुलासा केला. शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी कांदा रस्त्यावर फेकला. पण, त्यावेळी केंद्र सरकारने कांद्याला चांगला भाव न दिल्यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. आता तुर्कीतून कांदा आपल्याला आयात करावा लागत आहे आणि कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र या सगळ्यांविषयी लिहिले होते. हे असे घडेल असा इशारा त्या पत्रात दिला होता, असे पवार यांनी सांगितले.

शरद पवार महाविकास आघाडीत सहभागी होताना धर्मनिरपेक्षतेविषयी शिवसेनेला तडजोड करावी लागली का? या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ज्यावेळी कोणताही पर्याय एकत्र येऊन काम करण्याशिवाय शिल्लक राहत नाही. त्यावेळी तडजोड करावीच लागते. येथे तडजोड फक्त शिवसेनेलाच करावी लागलेली नाही, तर तडजोडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही स्वीकारल्या. घटनेचा कोणतही सरकार आदर करते आणि शिवसेनेने ते स्वीकारले. आम्ही सुरूवातीला विचार करत होतो की सरकार दोन पक्षाकडून चालवले पाहिजे. मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्ष विभागून देण्याचा विचार होता. पण, शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे होते. मग आम्ही होकार दिल्यामुळे आम्हीही तडजोडी स्वीकारल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Comment