ठरले… ! या तारखेला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार


पुणे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला नऊ दिवस उलटले असून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अद्याप झालेले नाही. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्यासोबत शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांना विरोधक बिनखात्याचे मंत्री म्हणू लागल्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथग्रहण केली आहे. भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आज पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले, भुजबळ यावर उत्तर देताना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे.

16 डिसेंबरपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होणार आहे. 17 डिसेंबर किंवा त्यानंतरच ठाकरे सरकारचा विस्तार होईल, असे बोलले जाऊ लागले असल्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला अजून 9 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर 6 नेत्यांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही.

महाविकास आघाडीने 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत त्यांच्याकडील बहुमत सिद्ध केले. तिन्ही पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्रामदेखील ठरला आहे. तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी अनेक बैठका, चर्चा झाल्या आहेत. या बैठका अद्यापही सुरुच आहेत. परंतु अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे कुठे अडकले आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर पुढील 7-8 दिवसात तोडगा निघाला नाही तर मंत्रीमंडळ विस्तार लांबेल.

Leave a Comment