मुख्यमंत्र्यांकडून ‘महापोर्टल’ला स्थगिती


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतील सहयोगी पक्षाकडून एका मागून एक माग होणाऱ्या मागण्या मान्य करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेल्या ‘महापोर्टल’ला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय विभागाच्या परीक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात या पोर्टलद्वारे होत होत्या. पण अनेक परिक्षार्थींनी या पोर्टलच्या अचुकतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच या पोर्टलला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यात आंदोलनही करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करत महापोर्टलवर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आरेच्या आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणीही मान्य केली होती.

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्याचबरोबर त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने करण्यात आल्या होत्या. माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment