
देशभरातील कोणत्याही पोलीस मुख्यालयात जाताना कुणीही नक्कीच पुन्हा विचार करेल. पण हेच पोलीस मुख्यालय अलिशान हॉटेल मध्ये बदलले गेले असेल तर ते पाहण्याची अनेकांची इच्छा असेल. भारतीय उद्योजक एम ए युसुफ अली यांच्या लुलू ग्रुपने लंडनचे प्रसिद्ध पोलीस स्कॉटलंड यार्ड मुख्यालय खरेदी करून त्याचे लग्झरी हॉटेल मध्ये रुपांतर केले आहे. येत्या सोमवार पासून हे हॉटेल सर्व ग्राहकांसाठी खुले होत आहे.
भारतीय उद्योजकाचे ग्रेट स्कॉटलंड यार्ड हॉटेल सुरु
या हॉटेलचे नाव ग्रेट स्कॉटलंड यार्ड हॉटेल असे आहे. युएई स्थित पण मुळचे केरळी युसुफ यांनी २०१५ मध्ये हे मुख्यालय १०२५ कोटींना खरेदी केले होते आणि त्यावर ५१२ कोटी खर्च करून त्याचे हॉटेल मध्ये रुपांतर केले गेले आहे. युसुफ म्हणतात लंडन हे जगातील एक मस्त शहर आहे. हे हॉटेल या शहराच्या लौकिकात भर घालेल. लंडनचा उजळ इतिहास आणि आधुनिक गौरव याचे हे प्रतिक आहे. मंत्री निकी मोर्गन याच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन याच आठवड्यात झाले.

या सात मजली हॉटेलमध्ये १५२ खोल्या असून १५ स्यूट आणि एक प्रेसिडेन्शियल स्यूट आहे. येथे चार रेस्टोरंट असून खोलीचे भाडे ४० हजार रुपयांपासून सुरु होते. १५- १६ व्या शतकात स्कॉटलंडचा राजा जेव्हा लंडनला येत असे तेव्हा या इमारतीत राहत असे. त्यानंतर तेथे पोलीस मुख्यालय सुरु झाले. सध्या स्कॉटलंड यार्डचे मुख्यालय कर्टिस ग्रीन बिल्डिंग येथे आहे.
