पूनम पांडेला बलात्कार, अॅसिड हल्ल्याची धमकी


हैदराबाद आणि उन्नावमधील बलात्कार आणि हत्याकांडाने देशभर संतापाची लाट असतानाच आपल्या बोल्ड फोटोमुळे कायमच चर्चेत असलेल्या अभिनेत्री पूनम पांडे हिला बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमकीचे फोन येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः ट्विट करून दिली असून त्याचबरोबर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिने या ट्विटमध्ये मुंबई पोलीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि गुगललाही टॅग करून मदत मागितली आहे.

हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर तिची जाळून हत्या करण्यात आली. संपूर्ण देश या घटनेने हादरला असतानाच, उन्नावमधील बलात्कारपीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात ती ९० ते ९५ टक्के भाजली होती. काल, शुक्रवारी रात्री उशिरा तिचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनांचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान अभिनेत्री पूनम पांडे हिने मला बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. तिने यासंबंधी ट्विट केले आहे. मुंबई पोलीस, गुगल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यात टॅग केले आहे. एका अॅपवरून माझा मोबाइल क्रमांक शेअर करण्यात आला आहे. मी याबाबत गुगलकडे वारंवार तक्रार केली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या मला दिल्या जात आहेत. मी २४ तास दहशतीखाली असते. कृपया मला मदत करा, असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तुमचा संपर्क क्रमांक पाठवू शकता का? असे विचारत या संदर्भात आम्ही दखल घेतली असल्याचे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment