खडसेंची मनधरणी करण्यासाठी चंद्रकांत पाटील जळगावात दाखल


जळगाव – भाजपकडून पक्षातील नाराज असेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सध्या दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संकटमोचक नेते गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात पोहचले. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु बैठक स्थळी हजेरी लावणेच एकनाथ खडसे यांनी टाळले.

भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पण उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या बैठका खडसे आणि महाजन यांच्या कार्यकर्त्यांमधील कोल्डवॉरमुळे पोलीस संरक्षणात होत आहेत.

पक्षातील नेत्यांनीच माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. महाजन यांनी खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर कराच, असे खुले आवाहन दिल्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, या बैठकीला येणेच खडसे यांनी टाळले.

Leave a Comment