ही होती पांडवाना दिली गेलेली पाच गावे


महाभारत युद्धाचा भारतीय संस्कृतीवर मोठा प्रभाव पडलेला आहे. कृष्णाने याच युद्धभूमीवर अर्जुनाला गीता सांगितली. मुळात हे युध्द टाळावे म्हणून कृष्ण आणि पांडवांनी खूप प्रयत्न केले होते. पांडवाना त्यांचा हिस्सा म्हणून खांडवप्रस्थ ही ओसाड आणि नापीक जागा धृतराष्ट्राने दिली आणि तेथेच पांडवांनी वैभवशाली इंद्रप्रस्थ स्थापले. मात्र द्युतात हरल्यावर त्यांना वनवासात जावे लागले हा इतिहास आपण जाणतो. वनवासातून परतल्यावर पांडवांनी त्यांचे राज्य परत मागितले मात्र सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही असे दुर्योधनाने बजावल्यावर युध्द करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही.


पांडवांचे राज्य म्हणजे ज्या पाच गावांचा उल्लेख केला जातो ती आजही अस्तित्वात आहेत. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. ही पाच गावे म्हणजे आजची पानिपत, सोनपत, इंद्रप्रस्थ, बागपत आणि तीलपत ही आहेत. पैकी पानिपत भारतीय इतिहासात महत्वाचे ठिकाण आहे कारण येथे तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत. हरियाणात कुरुक्षेत्र जवळ हे गाव आहे. महाभारत काळात या ठिकाणाला पांडूप्रस्थ असे नाव होते.


दुसरे गाव सोनप्रस्थ किंवा स्वर्णप्रस्थ म्हणजे आजचे सोनपत. हे गाव हरियाणात असून त्याचा अर्थ सोन्याचे गाव असा आहे. तिसरे इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. येथेच मयासुराने बांधलेल्या मयसभेत कौरव फजित पावले होते. आजही या गावात महाल, किल्ल्यांचे अवशेष आहेत. दिल्ली जवळील एका जागेला इंद्रप्रस्थ असे म्हटले जाते.


चौथे गाव बाघपत. हे उत्तर प्रदेशात आहे. तेथे पूर्वी वाघाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते असे मानले जाते. आज हे गाव बागपत नावाने ओळखले जाते आणि पौराणिक काळात या गावाचे उल्लेख आहेत. येथेच दुर्योधनाने पांडवाना जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते. मुगल काळात या गावाचे नाव बागपत पडले असावे असा अंदाज आहे. शेवटचे गाव आहे ते तिलपत. हरियाणात हे गाव असून त्याचे पूर्वीचे नाव तीलप्रस्थ असे होते. आज या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात असून अनेक ठिकाणी पुरातत्व विभागाला अनेक वस्तू मिळत आहेत. नुकतेच बागपत जवळ महाभारतकालीन रथ, हत्यारे आणि काही योध्याचे सांगाडे सापडले आहेत.

Leave a Comment