फरार स्वामी नित्यानंद याचा पासपोर्ट रद्द


स्वघोषित गुरु, बलात्काराचा आरोपी आणि फरारी घोषित केला गेलेला स्वामी नित्यानंद याचा पासपोर्ट भारत सरकारने यापूर्वीच रद्द केला असल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर ज्या इक्वाडोर देशात स्वतंत्र बेट खरेदी करून कैलास या नव्या देशाची स्थापना केल्याचा दावा नित्यानंदाने त्याच्या वेबसाईटवरून केला आहे त्यासंदर्भात इक्वाडोरच्या भारतातील राजदूतांनी इक्वाडोर सरकारने नित्यानंदला आश्रय दिला नसल्याचे स्पष्ट करताना या संदर्भात प्रसिद्ध केली गेलेली माहिती खोटी असल्याचा खुलासा केला आहे. इक्वाडोर सरकारने त्याला बेट जमीन खरेदीत कोणतीही मदत केलेली नही तसेच त्याची आश्रय देण्याची विनंती धुडकावली आहे असेही ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले, आपल्या सर्व दुतावासांना गुन्हेगारी आरोप असलेल्या नित्यानंद स्वामीबद्दल सावधगिरीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. दरम्यान गुजरात पोलिसांनी शुक्रवारी इंटरपोल कडे नित्यानंद याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. अशी मागणी करण्यासाठी सीआयडी नोडल एजन्सी असते आणि त्या संदर्भात नोडल एजन्सीला गुजरात पोलिसांनी पत्र पाठविले आहे. यात सदस्य देशांना संबंधित गुन्हेगाराबद्दल त्याच्याकडे माहिती असल्यास ती शेअर करणे बंधनकारक आहे.

बिदाडी येथील आश्रमात २०१० साली नित्यानंदचे पहिले स्कँडल उजेडात आले होते त्यात एका प्रसिध्द अभिनेत्रीसोबत त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नित्यानंद ८ वर्षे अज्ञातवासात होता. मात्र एक वर्षापूर्वी पुन्हा तो नवीन अवतारात उजेडात आला होता. अहमदाबाद येथील योगिनी सर्वज्ञ पीठम आश्रमात दोन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी आणि लहान मुलांशी लैंगिक संबंध ठेऊन त्यांना बंधक बनविल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यावर तो नेपाळ मार्गे देशाबाहेर फरार झाला आहे.

Leave a Comment