परदेशी भाषांची वाढती गरज

इंग्रजी भाषा आली पाहिजे हे आता सर्वांनाच कळायला लागले आहे. पण गेल्या काही दिवसांत अन्यही काही परदेशी भाषा शिकल्या पाहिजेत असेही लक्षात यायला लागले आणि अनेक विद्यार्थी फ्रेंच, जर्मन या भाषा शिकायला लागले. काही शहरांत रशियन भाषाही शिकल्या जात होत्या. मात्र या भाषा शिकण्यामागे प्रामुख्याने भाषांतर करण्याची कामे मिळावीत आणि दुभाष्या म्हणून नोकरी लागावी हाच मुख्य हेतू असे. आता आता यामागचा सारा दृष्टीकोनच बदलून गेला आहे.

त्यामुळे चिनी भाषा शिकून घेतली पाहिजे असे अनेकांना वाटत आहे कारण चीन ही आता जगातली एक महाशक्ती होत आहे आणि त्यामुळे आपला व्यापार  आणि व्यवहार चीनशी होणार आहे. इथपर्यंत ठीक होते. चिनी, फ्रेन्च, जर्मन या भाषांचे वर्ग अनेक मोठ्या शहरात चालत असत पण आता भारतीय तरुण, विशेषतः परदेशात जाऊन करीयर करण्याची इच्छा असलेले तरुण इतरही काही भाषांकडे वळायला लागले आहेत.

स्पॅनिश, पोर्तुगिज, इटालीयन आणि जपानी याही भाषा शिकण्याची इच्छा लोक व्यक्त करायला लागले आहेत. या मागचे कारण काय असावे, याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की अमेरिकेत बोलल्या जाणार्‍या अनेक भाषांत इंग्रजी खालोखाल स्पॅनिश भाषेला महत्त्व आहे. मुळात स्पेनमधून अमेरिकेत आलेल्या अनेक लोकांनी आपली ही भाषा जतन करून तर ठेवली आहेच पण ती बोलणारांची संख्या विचारात घेऊन  अमेरिकेच्या काही प्रांतांत तिला दुसर्‍या भाषेचे स्थान देण्यात आले आहे. यूरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही ही बर्‍याच जागी बोलली जाते. आता भारताचा दक्षिण अमेरिकेशी व्यापारी संबंध वाढत चालला आहे. त्यामुळे तिथल्या व्यापारात काही करण्याची इच्छा असणारांना स्पॅनिश भाषा शिकणे गरजेचे वाटायला लागले आहे.

इटालीयन भाषा शिकणार्‍यांचीही संख्या  वाढत आहे. कारण, भारतातले अनेक तरुण सध्या फॅशन डिझायनिंग आणि कार डिझायनिंगचे शिक्षण घेण्यासाठी इटलीला जात आहेत.भारतातून सध्या शेकडो आय.टी. तज्ञ जर्मनीत जात आहेत. भारतात काम करणार्‍या काही तरुणांना आपल्या जर्मनीतल्या कंपन्यांत चांगल्या पगारावर पाठवत असतात.

अनेक तंत्रज्ञांना आपली जर्मनीत बदली व्हावी असे वाटत असते पण तशी बदली करताना किमान १०० तास जर्मनीच्या वर्गात हजर असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जर्मन भाषा बोलता येणे  ही अशा बदलीची अट असल्याने अनेक तरुण जर्मन किवा तशी अट असलेल्या देशाची भाषा शिकतात. आजकाल काही जपानी कंपन्यांनी भारतातल्या काही तंत्रज्ञांना शिष्यवृत्त्या जाहीर केल्या आहेत पण त्या प्राप्त करण्यासाठी जपानी भाषा येण्याची अट आहे.

तिची पूर्तता करण्यासाठी काही लोक आता जपानी भाषेकडे वळायला लागले आहेत. परदेशी भाषांचे शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका आणि प्रगत पदविका अशा अभ्यासक्रमांत   दिले जाते. या भाषांचे हे महत्त्व जाणवायला लागले आणि विद्यार्थ्यांची संख्या फारच वाढली तर त्या सगळ्या भाषा शिकवणारे शिक्षक हीही एक मोठी रोजगारसंधीच ठरणार आहे.     

Leave a Comment