महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला मिळणार वाढीव मंत्रीपद


मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात छोटा बदल करण्यात आला असून एक अधिकचे कॅबिनेट मंत्रीपद आता या बदलानंतर राष्ट्रवादीला मिळणार आहे. आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेला 15 मंत्रीपदे, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 मंत्रिपदे आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदे मिळणार होती. यामध्ये 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपदे शिवसेनाला होती. पण एक वाढीव मंत्रीपद आता नवीन फॉर्मुल्यानुसार राष्ट्रवादीच्या पदरी पडले आहे. अद्याप याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी व्हावा, असा विचार सुरु आहे.

आता नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 15 मंत्रिपदे मिळणार आहेत. मुख्यमंत्रीपद आणि 11 कॅबिनेटसह चार राज्यमंत्रीपदे त्यामध्ये शिवसेनेला मिळणार आहेत. तर 16 मंत्रीपदे राष्ट्रवादीला मिळणार आहेत. यामध्ये 12 कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचाही समावेश आहे. तर 13 मंत्रीपदे काँग्रेसला मिळणार आहेत. यामध्ये 9 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदही देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. या सहा मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली आहे. काँग्रेसकडून नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीकडून जंयत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment