महाराष्ट्र सरकार लवकरच दाऊदलाही देईल क्लीन चीट


मुंबई – नुकताच आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपने टीका केली आहे. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारकडून गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून घाई करा कारण थोडेच दिवस बाकी असल्याचा टोला भाजपा मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असाही टोला यावेळी लगावला आहे.


आपल्या ट्विटमध्ये मोहित भारतीय यांनी असे म्हटले आहे की, सूत्र: महाराष्ट्र सरकारकडून दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आणि लवकरच त्याला क्लीन चीट देण्यात येईल. कारण महाराष्ट्र सरकारकडून सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा…थोडेच दिवस बाकी आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आरे कारशेडसाठी झाडे तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिल्यानंतर काल (सोमवारी) नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. आमदार राजन साळवी यांच्यासह ३३ जण, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह १६ जणांविरोधात पुतळा जाळल्याप्रकरणी नाणारसंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशोक वालम यांच्यासह आंदोलनात सहभागी २३ जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.

Leave a Comment