आगामी दोन दिवसात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप


मुंबई – राज्यातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर ठाकरे सरकारच्या स्थापनेच्या सर्व प्रक्रिया आणि आवश्यक नियुक्त्या पार पडल्या असून आता आगामी दोन दिवसांत मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी ही माहिती रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विधीमंडळात बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, आता या सर्वातून आम्ही मोकळे झालो असल्यामुळे आगामी काळात आम्ही काम वेगाने करु. एक दोन दिवसांत खातेवाटपही करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत असल्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नाही.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, छगन भुजबळ, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या हे सातही मंत्री सरकारचा कारभार चालवत आहेत.