आता या बंगल्यांमध्ये राहणार ठाकरे सरकारचे हे मंत्री


मुंबई – नुकतेच राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शासकीय बंगल्याचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहेत. ते लवकरच आपले वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीवरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुमही वर्षा निवासस्थानी आहे. ते तेथून मुख्यमंत्रिपदाचे कामकाज पाहणार आहेत.

त्याचबरोबर ‘रामटेक’ बंगल्यावर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राहणार आहेत. तर ‘रॉयलस्टोन’ या बंगल्यावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राहणार आहेत. तसेच ‘सेवासदन’ या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील राहणार आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाने एक पत्रक काढत बंगल्याचे वाटप केल्याचे जाहीर केले आहे.

गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपधविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी औपचारिकरित्या आपला कार्यभार स्वीकारला.

Leave a Comment