दरोडेखोराला पकडण्यासाठी महिला पोलिसाने लढवली जबरदस्त शक्कल

मध्य प्रदेशमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दरोडेखोराला पकडण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ती सध्या सर्वत्र चर्चाचा विषय ठरत आहे. मध्य प्रदेशमधील छतरपूर येथील नौगाव ब्लॉक येथे महिला पोलीस अधिकाऱ्याने कुख्यात दरोडखोर बालकिशन चौबेला पकडण्यासाठी त्याच्यासमोर खोटा लग्नाचा प्रस्ताव ठेवला व त्याला अटक केले.

छतरपूरच्या ग्रामीण भागात चोरी आणि दरोडा टाकणारा 55 वर्षीय बालकिशनने मागील 3 वर्षांपासून मध्य प्रदेश पोलीसांना जेरीस आणले होते. त्याच्याविरोधत हत्या आणि दरोड्याचे अनेक तक्रारी होत्या. अनेकदा छापा टाकल्यानंतर देखील पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. तो मध्य प्रदेशमध्ये गुन्हे करून उत्तर प्रदेशमध्ये लपत असे.

बालकिशन अनेक महिन्यांपासून लपला होता. मात्र त्याने लपण्याआधी काही ओळखीच्या व्यक्तींना त्याच्यासाठी नवरी शोधण्यास सांगितले होते. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी त्याला जाळ्यात अडकवण्याचे ठरवले. त्याला पकडण्याची जबाबदारी नौगाव ब्लॉकच्या गैरोली चोकीच्या पोलीस उपनिरिक्षक माधवी अग्निहोत्री यांना देण्यात आली.

30 वर्षीय माधवीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बालकिशनकडे खोटा लग्नाचा प्रस्ताव पाठवण्याची योजना सांगितली. त्यानंतर त्यांचा फोटो इनफॉर्मर्सकडून बालकिशनपर्यंत पोहचवण्यात आला.

लग्नाची चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील बिजोरी येथे भेटण्याचे ठरले. बालकिशन पोलीस अधिकारी माधवी यांना भेटायला पोहचताच पोलिसांनी त्याला पकडले.

Leave a Comment