एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा ताजमहाल विकणारा महाठग नटवरलाल. - Majha Paper

एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा ताजमहाल विकणारा महाठग नटवरलाल.


आजवर जगामध्ये अनेक ठग होऊन गेले, आणि आजवर अनेक महाठगही होऊन गेले. असाच एक महाठग भारतामध्येही होऊन गेला. मिथिलेश कुमार श्रीवास्तव असे या महाठगाचे नाव. यालाच नटवरलाल या नावानेही ओळखले जात असे. हा मनुष्य इतका कमालीचा डोकेबाज होता, की त्याचे कारनामे जाणून घेऊन आश्चर्याने थक्क व्हायला होते. याच महाठगाबद्दल काही रोचक तथ्ये खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

मिथिलेशचा जन्म १९१२ साली सिवान गावामध्ये झाला. मिथिलेश उर्फ नटवरलाल खरेतर पेशाने वकील होता, मात्र झटपट कमाई करण्याच्या उद्देशाने अनेक लोकांच्या खोट्या सह्या करून याने अनेकांना लुबाडले आहे. हा एक निष्णात ‘फोर्जर’ असून, कोणाची कितीही अवघड सही हा हुबेहूब करीत असे. अगदी धीरूभाई अंबानींपासून इतरही अनेक नामवंत हस्तींच्या सह्या त्याला हुबेहूब करता येत असत. इतकेच नव्हे तर निरनिराळ्या रूपांमध्ये आणि निरनिराळ्या नावांनी नटवरलालने अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. नटवरलालने सर्वप्रथम खोट्या सह्या करून एक हजार रुपयांची फसवणूक केली होती. त्यांनतर अनेकांच्या खोट्या सह्या करून त्याने लाखो रुपये लुबाडले. नटवरलालला अनेकदा पोलिसांनी अटकही केली, पण तो दरवेळी तुरुंगातून मोठ्या शिताफीने फरार होत असे.

नटवरलालने आपण बडे सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अनेक परदेशी पर्यटकांना प्रसिद्ध भारतीय वास्तू विकण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले. त्यामध्ये त्याने तीन वेळा ताजमहालाची, एकदा दिल्लीतील लाल किल्ल्याची आणि एकदा चक्क राष्ट्रपती भवनाची देखील विक्री केली. त्याही पुढे जाऊन संसद सभासदांसह संपूर्ण संसद भवनाची विक्री देखील या पठ्ठ्याने केली. असले एका पेक्षा एक मोठे पराक्रम करणाऱ्या नटवरलालला अनेकदा पोलिसांनी अटक केली, त्याच्यावर खटले भरले गेले. या सर्व खटल्यांमध्ये मिळून नटवरलालला एकूण एकशे तेरा वर्षे कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली, पण नटवरलाल अनेकदा तुरुंगातून फरार झाल्याने एकशे तेरा वर्षांपैकी जेमतेम वीस वर्षे तो करावासामध्ये राहिला. १९९६ साली ज्यावेळी नटवरलाल पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून पळाला त्यावेळी त्याचे वय ८४ वर्षांचे होते ! त्यावेळी त्याला कानपूर कारागृहातून दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणले जात होते. व्हीलचेअरवर बसलेला ८४ वर्षांचा नटवरलाल त्यावेळी पोलिसांनी पाहिला, तो शेवटचाच. त्यानंतर नटवरलाल पुन्हा कोणाच्याच दृष्टीला पडला नाही.

१९९६ साली नटवरलालचा मृत्यू झाला असून, आपण त्यांचे अंतिमविधी केल्याचे नटवरलालचा भावाने जाहीर केले. मात्र खुद्द नटवरलालच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार नटवरलाल त्यावेळी जिवंत असून, त्याचा मृत्यू वयाच्या ९७व्या वर्षी, २००९ साली झाला. नटवरलालने आपल्या हयातीमध्ये कमाविलेली काही संपत्ती आपल्या गावातील गोरगरिबांना दान केली असल्याने नटवरलालला ‘सिवानचा रॉबिन हूड’ ही उपाधीही दिली जात असून, त्याच्या आठवणी आजही त्याच्या गावातील लोकांच्या मनामध्ये ताज्या आहेत.

Leave a Comment