हे सरकार देणार बिअर आणि वाइनवर मिळणार 25 टक्के सवलत


नवी दिल्ली – देशभरात हळुहळु हिवाळ्याची सुरुवात होत आहे. त्यातच आता तळीरामांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण येत्या काही दिवसांत वाइन आणि बीअरवर तब्बल 25 टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी चक्क एका मोठ्या सेलचे आयोजन करून वाईन आणि बिअरची विक्री केली जाणार आहे. मोफत वीज आणि पाणीपुरवठा करणाऱ्या दिल्ली सरकारच्या अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच हा सेल चक्क सरकारतर्फे लावण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.

दिल्लीच्या आठ भागात लवकरच या दारूची विक्री सुरू होईल. कर न भरता विक्रीसाठी जात असलेल्या अवैध दारूचा फार मोठा साठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या दारू प्रकरणांचा निकाल जोपर्यंत लागत नाही, ही दारू तोपर्यंत सरकारी गोदामांमध्ये सुरक्षित ठेवली जाते. पण प्रकरण संपताच ती सरकारी यंत्रणेच्या देखरेखीखाली नष्ट केली जाते. पण, ही दारू नष्ट करण्याऐवजी दिल्ली सरकार आता ती बाजारभावापेक्षा 25 टक्के कमी भावात विकणार आहे.

दिल्ली सरकार अशाप्रकारे अवैध दारूच्या विक्रीतून पैसा उभा करणार आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तस्करी केलेली दारू विक्रीस वित्त विभागाकडून दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाला परवानगी मिळाली आहे. दारू विक्री करण्यापूर्वी दारू विकण्यास योग्य आहे की नाही याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. दिल्ली महानगरपालिकाच्या चार भागात प्रत्येकी दोन दुकानांतून ही दारू विक्री केली जाईल अशी सरकारची योजना आहे.

केवळ तस्करी करण्यात आलेली दारू, विदेशी मद्य आणि बिअरची विक्री दिल्ली सरकार करणार आहे. तस्करी होणारी देशी दारू विकली जाणार नाही. जप्त केलेली दारू 25 टक्के कमी दराने विकली जाईल. ही पकडलेली दारू हरियाणाची असून या बाटलीची हरियाणामध्ये साधारण किंमत 500 रुपये आहे, तर आता ती दिल्लीत 25 टक्के कमी दराने विकली जाईल.

Leave a Comment