असा आहे महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम


मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येत असून तत्पूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती पत्रकारपरिषदेद्वारे देण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

याप्रसंगी सर्वप्रथम माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातला प्रत्येक निर्णय हा घटनेच्या प्रास्ताविकाला धरून असेल, राज्यातील जनतेच्या हितासाठी ही महाविकास आघाडी सदैव कार्यरत असेल, भारतीय संविधानाने सांगितलेले मूल्य आणि तत्व आघाडीच्या प्रत्येक निर्णयात केंद्रस्थानी असतील, महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेऊन, महाविकासआघाडीचे निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी समान असा या आघाडीचा मुख्य कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये भाषा, जात, धर्म असा कुठलाही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही.

याचबरोबर राज्यात आज वाढलेली बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण यामुळे जनतेत जो काही अंसतोष आहे. हे पाहता महाविकासआघाडी राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. या देशातील राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे ही आघाडी प्रतिबिंब असेल. कोणालाही भीती वाटणार नाही, कोणालाही झुकते माप दिले जाणार नाही. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, हाच आमचा अजेंडा असणार आहे. शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, लघु उद्योजक, छोटेमोठे उद्योजक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार सर्व जाती-धर्म, सर्व घटक यांना या ठिकाणी न्याय देण्याचे काम या किमान समान कार्यक्रमात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी, सर्वसामान्य माणूस आज संकटात असल्यामुळे हे आपले सरकार त्यांना वाटले पाहिजे, हा किमान समान कार्यक्रम याचा आधारावर तयार करण्यात आलेला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी आणि त्यांच्या मान्यतेने हा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. येणारे आमचे सरकार हे अतिशय मजबूत असणार आहे. या राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बहुमतापेक्षा कितीतरी जास्त संख्याबळ महाविकासआघाडीकडे आहे, असे देखील शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Comment