माझे काम संपले, उद्यापासून माझी चिडीचूप


मुंबई: आमचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचे सूर्ययान उतरवण्याचे मिशन फत्ते झाले असून आता माझी जबाबदारी कमी झाली असल्याचे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण उद्यापासून प्रसारमाध्यमांशी बोलणार नसल्याचे म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजप-शिवसेना युतीतील वाद चिघळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सातत्यानं संवाद साधून नवी सत्तासमीकरणे जुळवण्यात मोलाचा वाटा होता. भाजप महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ नये म्हणून करत असलेल्या राजकारणावर राऊत हे रोजच्या रोज प्रहार करत होते. ते कायमच शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे ठामपणे सांगत होते. भाजपकडून त्यांना खलनायक म्हणून देखील संबोधण्यात आले होते. आज त्यांनी हे प्रयत्न फळाला आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राचे पुढचे सूर्ययान दिल्लीत उतरेल, असा विश्वास प्रसन्न मूडमध्ये असलेल्या राऊत यांनी व्यक्त केला.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे सूर्ययान उतरेल असे, वारंवार म्हणत होतो. तेव्हा लोक माझी चेष्टा करत होते. पण आम्हाला आमचा पक्ष आणि आम्ही काय करत आहोत हे पक्क माहीत असल्याचे ते म्हणाले. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी होतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ते बोलतील. आता आमचे मिशन पूर्ण झाले असून आपले काम संपले असल्याचे खुद्द शरद पवारच मला म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितले.

तुम्ही शिवसेनेचे चाणक्य आहात का असा प्रश्न विचारला असता, आम्ही चाणक्य वगैरे नाही. चाणक्य ही खूप मोठी व्यक्ती होती. आम्ही लढणारे आहोत. परिणामांची पर्वा न करता लढणारे शिवसैनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार किंवा तुटणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिला.

महाविकास आघाडीचे शिल्पकाकर शरद पवार यांचे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कौतुक केले. भाजपला शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे मी उगाच म्हणालो नव्हतो. शरद पवारांचा इतिहास भाजपने चाळून पाहायला हवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Comment