असे असू शकते उद्धव ठाकरेंचे मंत्रिमंडळ


मुंबई – अवघ्या तीन दिवसातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीला सत्तास्थापनेच राज्यपालांनी आमंत्रण दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वीच कोण-कोण नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतील, अशी चर्चा सुरू असून, या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.

बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पण, अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्यानंतर फडणवीस यांनी बहुमत नसल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपचे सरकार कोसळल्यानंतर आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. महाविकास आघाडीचे मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता नेमका कुणाचा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून एकनाथ खडसे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार यांची नावे आघाडीवर आहेत.

Leave a Comment