
मुंबई : उद्या शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जंगी स्वरुपात हा शपथविधी सोहळा होणार आहे. कारण या सोहळ्याला देशभरातील महत्वाच्या व्यक्ती हजेरी लावण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण
या शपथविधी सोहळ्याचे देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले.
