आता सत्ता स्थापनेचा दावा करणार महाविकास आघाडीचे नेते


मुंबई: पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी काही वेळातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला आहे. या वेगवान घडामोडींनंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आता महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात येणार आहे.

थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे तीनही गटनेते व अन्य प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीची हा दावा करण्यात आल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव या परिषदेत घोषित करण्यात येणार आहे. अर्थात हे नाव उद्धव ठाकरेच असेल हे आधीच स्पष्ट झालेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार हेच करतील, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment