शेवटच्या क्षणापर्यंत पवारांचा काही नेम नाही – बच्चू कडू


मुंबई – राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. बच्चू कडू एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले, शरद पवारांबद्दल येथे सगळ्यांच्या मनात भिती आहे. शपथविधी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण कुठलाही भरवसा देऊ शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार कुठेही जाऊ शकतील. त्याचबरोबर खुद्द अजित पवारांना शरद पवार काय करतात, हे समजले नाही, ते मला काय कळणार, असे म्हणत बच्चू कडूंनी टोला लगावला.

दरम्यान, यावेळी बच्चू कडूंनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकासआघाडीला पाठिंबा देण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी हेच गृहीत धरले होते की भाजप-शिवसेनेचे सरकार येईल आणि त्यामुळेच पाठिंबा दिला होता. पण कालांतराने राजकारण बदलत गेले आणि राजकारणानुसार धोरण देखील बदलले आणि जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच होत असल्याचे आपण समजू. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध होते. पण उद्धव ठाकरेंना मी शब्द दिला होता. शब्दाच्या पुढे काहीही नसते. भाजपकडून पाठिंब्यासाठी पुन्हा प्रयत्न झाला होता. पण मी मातोश्रीला शब्द दिला होता, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Leave a Comment