भाजपबाबत राज ठाकरेंनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली


मुंबई – लवकरच राज्यातील सरकार स्थापनेचा प्रश्न सुटणार असून राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या दरम्यान राजकीय परिस्थितीवर गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, नाशिक येथील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय भविष्यावर भाष्य केले होते. शिवसेना निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार तर, विरोधी पक्षात भाजप बसणार असे वक्तव्य राज ठाकरे यांनी त्यावेळी केले होते. काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत हिरवा कंदील मिळाला असून राज्यात लवकरच महाविकासआघाडीचे सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खरे ठरण्याची शक्यता आहे.

नाशिक येथे दोन वर्षापूर्वी राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले होते की, भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढवणार आणि निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार…हा काय पत्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला, अशी भविष्यवाणी राज ठाकरे यांनी केली होती.

Leave a Comment