मित्राला भावनिक आधाराची गरज


प्रेमभंग, वैफल्य, दुरावा, प्रेमाचा अभाव, अपयशाने, पराभवाच्या भितीने, कमी गुणांमुळे होणारी अवलेहना, पालकांतील भांडणे, कुटुंबातील विसंवाद आदी कारणामुळे मुले किंवा मुली उदास राहत असतात. अशा मंडळींना मनमोकळेपणाने बोलणारा मित्र, सहकारी भेटला नाही तर त्यांच्या चिंतेत, काळजीत आणखीच भर पडते त्याला चांगले मित्र-मैत्रिणी असतील तर मनावरचे दडपण दूर होते आणि वाईट विचार आपोआप कमी होतात. तुम्हीही तुमच्या जवळच्या मित्राला भावनिक आधार देऊ शकता. यासाठी काय करता येईल?

संवाद वाढवा – एखादा मित्र सतत विचार किंवा काळजी करत असेल तर त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा. त्याचे मन हलके करण्यासाठी सतत बोलत राहा. विविध विषयांवर बोलून काळजीचा मुद्दा मुलाकडून काढून घ्या आणि त्यावर मार्ग कसा काढता येईल, यावर चर्चा करा.

पालकांशी संवाद – मित्राच्या मनातील भय, चिंता दूर करण्यासाठी त्याला फिरायला नेणे, संगीत रजनीसारख्या कार्यक्रमांना सोबत नेणे अशा गोष्टी करणे गरजेचे आहे. पालकांशी संवाद वाढेल यासाठी मित्रांनी प्रयत्न करायला हवेत. त्याच्या अडचणी समजून त्या अडचणी पालकांना सांगणे गरजेचे आहे.

वेळ द्या – काळजीग्रस्त मित्राला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. कॉलेजमध्ये, फिरायला जाताना त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तो आपल्याशी संवाद साधेल आणि अडचणीची माहिती देईल.

आव्हानावर चर्चा – एखाद्या घटनेने किंवा प्रकाराने मानसिक धक्का बसू शकतो. त्यातून बाहेर येण्यासाठी बराच काळ लागतो. मित्र म्हणून आपण मदत करताना घडलेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा किंवा काळजी करण्यापेक्षा भविष्यातील आव्हानावर चर्चा करा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करा. चांगली पुस्तक, सिनेमा या माध्यमातून त्याच्या मनावरचा ताण हलका करण्याचा प्रयत्न करा आणि घडलेल्या गोष्टींचा विसर कसा पडेल, याकडे लक्ष द्या.

ताण दुर करा – मानसिक आणि शारिरीक मशागत झाल्यास काळजी, चिंता काही प्रमाणात कमी होते आणि नवीन विचारांना स्थान मिळते. याशिवाय विविध वाहिन्यांवर सकाळच्या वेळी योग, प्राणायामचे कार्यक्रम असतात. त्याचे अनुकरण केल्यास घरबसल्या मानसिक ताण दूर करण्याचे प्रशिक्षण मिळू शकते. शरिरातील आळस, नैराश्‍य, कंटाळा, थकवा हा नियमित व्यायामामुळे दूर होतो.

योग आणि व्यायाम – योग आणि व्यायाम हे सर्व ताणावरचा रामबाण उपाय मानला जातो. सकाळी लवकर उठून योग, प्राणायाम, व्यायाम केल्यास मानसिक ताण, थकवा दूर होण्यास हातभार लागतो. काळजीने व्यथित झालेल्या मित्राला योगाचा किंवा व्यायामाचा सल्ला द्यावा. गरज पडल्यास आपणही सुरवातीला त्याच्यासोबत व्यायामाला जीमला जावे.

Leave a Comment