शरद पवार घेणार नरेंद्र मोदींची भेट


नवी दिल्ली – आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भेट घेणार आहेत. अद्याप महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच, आता पवार यांची पुढची चाल काय असेल याबाबत त्यांचे मित्रपक्षही खात्री देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संसदेमध्ये या दोघांची बैठक दुपारी १२ वाजता होणार आहे. ही राजकीय बैठक नसून, यामध्ये पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगून, त्यांच्यासाठी मदतनिधी देण्याबाबत मोदींशी पवार चर्चा करतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.

दिवसेंदिवस महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा पेच हा अधिकाधिक वाढत चालला आहे. त्यात शरद पवारांकडून येणाऱ्या उलट-सुलट वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक निर्माण होत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी युती होण्याची चिन्हे दिसत असतानाच, सत्तास्थापनाबाबत शिवसेना-भाजपला विचारा असे शरद पवारांनी म्हणत सर्वांनाच कोड्यात पाडले होते. तर दुसरीकडे, नरेंद्र मोदींनी राज्यसभेच्या २५०व्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे कौतुक केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची आजची भेट महत्त्वपूर्ण असणार आहे.

Leave a Comment