शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट


नवी दिल्ली – बुधवारी दुपारी संसद भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्याकडून राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तब्बल पाऊण तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे नाकारता येणार नाही. राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी संसद भवनामध्ये प्रवेश करताना कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना देण्यास नकार दिला.

भाजप आणि शिवसेनेतील युती मुख्यमंत्रीपदावरून तुटल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच याबद्दल औपचारिक घोषणा केली जाईल आणि नवे सरकार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सत्तेवर येईल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

राज्यात परतीच्या पावसानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे सगळ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. शरद पवार यांनीच नागपूर दौऱ्यावर असताना आपण लवकरच हे सर्व मुद्दे घेऊन नरेंद्र मोदी यांना भेटू असे म्हटले होते. त्यानंतर ही भेट झाली आहे.

सोमवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आमचे शिवसेनेसोबत जाण्याचे काहीच ठरलेले नाही. आमची या संदर्भात कोणतीही चर्चाही झालेली नाही, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते भेटणार आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Comment