संपूर्ण देशभरात लागू होणार एनआरसी – अमित शहांची राज्यसभेत घोषणा


नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात एनआरसी लागू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज संसदेत केली. तसेच, कोणत्या एका धर्मातील नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शहा राज्यसभेत बोलताना म्हणाले की, धर्माच्या आधारे लोकांना एनआरसीमध्ये बाहेर करण्याचा कोणता विचार नाही. जर एनआरसीमधून कोणाचे नाव बाहेर केले असेल, तर ट्रिब्यूनलमध्ये अर्ज करण्याचा त्यांना अधिकार आहे. जर यासाठी कोणाकडे पैसे नसतील, तर आसाम सरकार त्यांच्यासाठी वकीलाची सोय करतील. आसाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात आले आहे.

विरोधी पक्षाने बुधवारी राज्यसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. गृहमंत्री अमित शहा यांनी यावर तेथील परिस्थिती सभागृहात मांडली. 5 ऑगस्टनंतर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरात पोलिसांच्या गोळीने एकही मृत्यू झालेला नाही असा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. ते इंटरनेटबद्दल बोलताना म्हणाले, की इंटरनेट बंदी या ठिकाणी यापूर्वीही लागू करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाला विचारूनच इंटरनेट बंदी लागू केली जाईल. काश्मीरात पाकिस्तानकडून दहशतवादी हालचाली सुरूच राहतात. त्यामुळे, आम्हाला सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते.

तत्पूर्वी गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. काँग्रेसने हा मुद्दा चर्चेत उपस्थित केला. त्यावर बोलताना, गांधी कुटुंबियांची सुरक्षा काढण्याचा निर्णय सरकार आणि गृहमंत्रालयाने घेतला आहे. हा निर्णय काही एका नेत्याने घेतला नसल्याचे भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी सांगितले. काँग्रेस नेत्यांनी या निर्णयामागे पक्षापातीचा आरोप केला होता. परंतु, भाजपने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला. कुठल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची सुरक्षा देण्यात यावी हे सर्वस्वी त्यांना असलेल्या धोक्यावरून ठरवले जाते. त्याच आधारे एखाद्या व्यक्तीला सुरक्षा दिली आणि परतही घेतली जाते असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment