गुगलचे हे खास फिचर सुधारणार तुमचे उच्चार


मुंबई : अनेकवेळा काही शब्दांचा उच्चार करणे कठिण काम होऊन बसते. मग त्या शब्दाचा कसा उच्चार करावा यासाठी आपली धडपड सुरु होते. आता यासाठी आपली मदत गुगल करणार आहे. आपल्या युजर्ससाठी गुगल नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यातच आता गुगलने असेच एक फिचर लॉन्च केले आहे. यामध्ये एखाद्या शब्दाचा योग्य उच्चार समजून घेणे शक्य होणार आहे.

गुगल सर्चसाठी एक फिचर गुगलने लॉन्च केले आहे. आपले उच्चार (Pronunciation) योग्य आहेत की नाही हे समजणे या फिचर अंतर्गत शक्य होणार आहे. या फिचरचा वापर याआधी गुगल सर्च करून एखाद्या शब्दाचा योग्य उच्चार ऐकण्यासाठी करण्यात येत होता. पण हे फिचर वापरून आता योग्य शब्द उच्चारताही येणार आहे. याच फिचरमध्ये यूजर्सना स्पिक नाऊ हा पर्याय उपलब्ध असणार आहे.

या फिचरसाठी गुगलने मशीन लर्निंगचा वापर केला आहे. एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करावा, हे आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमार्फत अॅनालाइज केले जाते. गुगलचे स्पीच रेकग्निशन टूल उच्चारलेला शब्द प्रोसेस करून तो एक्सपर्ट्सच्या उच्चारासोबत मॅच करणार आणि त्यानंतर शब्दाचा योग्य उच्चार सांगणार.

ज्या शब्दाचा उच्चार तुम्हाला कठिण वाटतो, तो शब्द सर्च करा. तुम्हाला तिथे स्पिक नाऊ असा पर्याय मिळेल. तुम्ही तो शब्द माइक आयकॉनवर टॅप करून बोलू शकता. तुम्ही तो शब्द उच्चारल्यानंतर तुम्हाला गुगलचे नवीन फिचर सांगेल की, तुम्ही त्या शब्दाचा उच्चार बरोबर केला की नाही. तसेच तुमची तो शब्द उच्चारताना काय चूक होत आहे आणि ती चूक तुम्ही कशी सुधारू शकता, हे फिचर याबाबतही तुमचे मार्गदर्शन करणार आहे. हे फिचर सध्या फक्त इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे. याबाबत कंपनीने असे सांगितले आहे की, हे फिचर आगामी काळात इतरही भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येईल.

गुगलने सांगितले की, हे फिचर एक्सपरिमेंटल असून हे फक्त सध्या मोबाईलसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या फिचरमध्ये अनेक सुधारणा करण्याचे काम सुरु असून काही ऑप्शन्सही जोडण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त या फिचरसोबत गुगलने वर्ड ट्रान्सलेशन आणि डेफिनेशनमध्येही काही बदल केले आहेत. आता तुम्ही जर एखादा शब्द ट्रान्सलेट केला तर गुगल त्या शब्दाशी निगडीत इमेजेससुद्धा तुम्हाला दाखविणार आहे. याबाबत बोलताना गुगलने सांगितले की, सध्या पिक्चर ट्रान्सलेशन हे फिचर फक्त इंग्रजी भाषेसाठीच काम करणार आहे.

Leave a Comment