संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकांवर बसणार शिवसेना खासदार


मुंबई : उद्या होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. एनडीएतून शिवसेना बाहेर पडणार याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे म्हटले जात आहे. आता भाजपप्रणित एनडीएचा भाग नसल्याने शिवसेना खासदारांच्या सभागृहात बसण्याच्या जागाही बदलणार आहेत. राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे सदस्य आहेत. त्यांची रवानगी आता सत्ताधारी बाकांवरून विरोधी बाकांवर होणार आहे. लवकरच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिवसेना खासदार या अधिवेशनात पहिल्यांदाच विरोधी बाकांवर बसलेले दिसणार आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. एनडीएच्या घटकपक्षांची या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे रविवारी बैठक होणार आहे. परंतु, शिवसेना या बैठकीला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खुलासाही केला आहे. आता शिवसेना ‘रालोआ’तून बाहेर पडली तर त्यांच्या खासदारांची जागा बदलेल. शिवसेना नेते दोन्ही सभागृहात सत्ताधारी बाजूच्या बाकांवर बसत होते. ते आता विरोधी बाकांवर बसतील.

Leave a Comment