मुशर्रफ यांची कबुली, भारतीय लष्कराविरुद्ध कारवायांसाठी काश्मिरींना पाककडून प्रशिक्षण


नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांची भारतीय लष्कराविरूद्ध कारवायांसाठी पाकिस्तानने काश्मिरींना प्रशिक्षण दिले, अशी कबूली देणारी मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे. मुशर्रफ यांनी हा खुलासा काश्मीरमधील हिंसाचाराविषयी बोलताना केला आहे. पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानी हे हिरो असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

भारताने पुराव्यानिशी वारंवार जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानकडून भारतात हल्ले करण्यासाठी दहशतवादी संघटनांना खतपाणी घालण्यात येते, असे दाखवून दिले आहे. पण, पाकिस्तानकडून सातत्याने याचा इन्कार केला जातो. दरम्यान, दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने तयार केल्याची कबूली देणारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देण्यापासून रसद पुरण्यापर्यंत पाकिस्तानने मदत केल्याचे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.


सोव्हिएत युनियनला १९७९मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याबरोबर पाकिस्तानला फायदा होण्यासाठी आम्ही धार्मिक लष्कराची सुरूवात केली. मुजाहिद्दीन अर्थात जिहादी आम्ही जगभरात शोधले. त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांना शस्त्रास्त्र पुरवली. ते आमचे हिरो होते. हक्कानी आणि ओसामा बिन लादेन आमचा हिरो होता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. आता आमचे हिरो व्हिलन झाल्याचे या मुलाखतीत मुशर्रफ सांगत आहेत.

मुशर्रफ यांनी याच मुलाखतीत काश्मीरातील अस्थिरतेवर बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे. पाकिस्तानात जे काश्मीरी येत आहे, हिरोसारखे त्यांचे स्वागत केले जायचे. आम्ही त्यांच्याकडे धर्मयोद्धे म्हणूनच बघायचो. आम्ही त्यांना काश्मीरमध्ये भारतीय लष्कराविरूद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण आणि पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय लष्करावर हल्ले करणारी लष्कर ए तोयबासारखी दहशतवादी संघटना उदयास आली. ते आमचे हिरो असल्याचा खुलासा मुशर्रफ यांनी या मुलाखतीत केला आहे.

Leave a Comment