रोहित पवारांसह शरद पवारांनी लिलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट


मुंबई – सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेचप्रसंग महाराष्ट्रात निर्माण झाला असून शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. परिणामी, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. आजचा दिवस सत्तास्थापनेसाठी निर्णायक मानला जात आहे. आज महत्त्वाच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या बैठका होणार आहेत. त्याच शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची शरद पवार यांनी लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली.

संजय राऊत यांची आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. पवार लिलावतीमध्ये जवळपास १५ मिनिट होते, त्यांनी यावेळी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या अशी माहिती आहे. यावेळी राऊत आणि पवार यांच्यामध्ये काही खलबते झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण राऊत यांच्या भेटीनंतर पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे.

आज ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होत आहे. शरद पवार त्यापूर्वी संजय राऊत यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंना शरद पवार यांनी रात्री उशीरा फोन करुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी आज, मंगळवारी मुंबईत पोहोचणारे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाळ आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा होऊन शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण शिवसेनेकडेच तीन पक्षांच्या संभाव्य सरकारचे नेतृत्व ठरल्यानुसार सोपविले जाईल काय, यावर सोमवारी काँग्रेसच्या पवित्र्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.

Leave a Comment