सोशल मीडियात व्हायरल होत आहेत आघाडीवर बाळासाहेबांचे टीका करणारे व्हिडीओ


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता नव्या वळणावर येऊन पोहचला असून शिवसेनेच्या वतीने भाजपसोबत राज्यात असलेले संबंध आता औपचारिकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा अहंकारी असा उल्लेख केल्यामुळे राज्यात आता सत्ता स्थापन करण्यासाठी नव्या समीकरणांनी वेग धरला आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करुन शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर नेते मंडळींच्या गाठीभेटी आणि बैठका देखील सुरु झाल्या आहेत. पण या सगळ्यात सोशल मीडियावरील नेटकरी शिवसेनेला एका वेगळ्याच गोष्टींची आठवण करुन देत आहे.


ट्विटर सध्या #ShivSenaCheatsMaharashtra हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. जनता शिवसेनेवर फसवणूकीचा आरोप करत आहे. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे जुन्या मुलाखतीचे व्हिडीओ ज्यात बाळासाहेब काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत आहेत, ते शेअर करत आहेत.


यातील एका व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर कठोर शब्दात टीका करत आहेत. ते काँग्रेसमधील पंचकडी म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि अहमद पटेल यांच्यावर टीका करताना म्हणत आहेत की, सोनिया गांधी विदेशी औलाद आहे आणि मुघल गेले त्यानंतर इंग्रजांच्या जाण्यानंतर आता इटलीमधील लोक आले आहेत. बाळासाहेबांनी या व्हिडीओत काँग्रेसचे समर्थन करणाऱ्या हिंदुचा कमजोर म्हणून उल्लेख केला आहे.


एका अन्य व्हिडीओला ट्विटरवर जोरदार प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्यात बाळासाहेब राष्ट्रवादीशी कधीही हातमिळवणी करण्याचे बोलत आहेत. यात ते म्हणत आहेत, ज्या व्यक्तिचा अटलजींचे सरकार पाडण्यात सर्वात मोठा हात होता त्या व्यक्तिशी कशी हातमिळवणी करता येईल. बाळासाहेब पुढे म्हणतात, खालच्या दर्जाच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्याशी कधीच हातमिळवणी करणार नाही.


दरम्यान महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमिवर केंदातील मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असलेले खासदार अरविंद सावंत आपल्या मंत्रीदाचा राजीनामा देणार आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने अहंकार दाखवल्याचे म्हणतानाच सरकार स्थापन करण्यासाठी 50-50चा फॉर्म्युला असताना भाजपने आपला शब्द फिरवला. त्याचबरोबर त्यांनी भाजपशी आता असलेले संबंध फक्त औपचारिक असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसशी चर्चा केल्यानतंरच शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105, त्याखालोखाल शिवसेना 56 जागा जिंकल्या आहेत. भाजप शिवसेनेने ही निवडणुक युती करु लढवली होती. पण आता दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही पक्षांनी मित्र पक्षांसह 99 जागा जिंकल्या आहेत. तर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा जादुई आकडा आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आल्यास 154 चा आकडा होतो. जो सत्ता स्थापन करण्यासाठी पर्याप्त आहे.

Leave a Comment