मिताहाराबाबत तारतम्य हवे


सध्या सगळ्याच लोकांमध्ये वजन घटवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. काही लोक महिन्याभरात १० किलो वजन घटवल्याचा दावा करतात. तर काहीजण ३ महिन्यात २५ किलो वजन कमी करण्याचा दावा करतात. त्यांचे खरे वजन, त्यांचा आहार आणि त्यांचे कमी झालेले वजन यापैकी कोणतीही माहिती आपल्याला वस्तुनिष्ठपणे होत नसते. मात्र आपण त्या संबंधातल्या अतिशयोक्त दाव्यांवर विश्‍वास ठेवून, आहार कमी करायला लागतो. कमी खाल्ल्याने आपलेही वजन महिन्याभरात १० किलोने कमी होईल अशी आपलीही अपेक्षा असते. परंतु वजन कमी करण्यासाठी फक्त आहार कमी करून भागत नाही. किंबहुना डॉक्टरांचा सल्ला न घेता आहार कमी केल्यास वजन तर घटत नाहीच पण दुसरेच प्रश्‍न निर्माण होतात.

अन्न कमी खाल्ल्याने आपल्या केसांवर परिणाम होतो. केस चांगले आणि निरोगीपणे वाढावेत यासाठी काही पोषक द्रव्यांची गरज असते आणि केसांना मिळणारी ही पोषक द्रव्ये पोटात घेतल्या जाणार्‍या अन्नातूनच मिळत असतात. मात्र वजन कमी करण्याच्या नादाने आपण कमी खायला लागतो तेव्हा केसांवर त्यांचा परिणाम होऊन ते गळायला लागतात. त्यांची चमक कमी होते. कमी खाण्याचा दुसरा परिणाम म्हणजे झोप बिघडणे. जेवण मर्यादेपेक्षा कमी केले की झोप पुरेशी आणि शांत होत नाही. झोप विस्कळीत होते आणि आपण सकाळी उठतो तेव्हा म्हणावे तेवढे फे्रश राहत नाही. आपण जर झोपेतून उठतानाच थकलेले असू तर दिवस कसा चांगला जाईल.

कमी खाणे हे आरोग्याला चांगले असते असे कितीही सांगितले जात असले तरी कमी म्हणजे नेमके किती आणि नेमके काय याची व्याख्या आपल्याला कळली नाही आणि ती न कळताच आपण आपल्या मनानेच आहार कमी केला तर आपण सडपातळ न होता दुबळे म्हणजे क्षीण व्हायला लागतो. आपले पोट आत गेलेले आपल्याला दिसते परंतु ते निरोगीपणाचे लक्षण नसते तर ते अशक्तपणाचे लक्षण असते. म्हणून मिताहार आणि डाएटिंग यातील सूक्ष्म सीमारेषा आपल्याला कळलीच पाहिजे. ती न कळताच आपण डाएटिंगच्या नावावर मिताहार घ्यायला लागलो किंवा अल्पाहार घ्यायला लागलो तर आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मेंदूला पुरेशी तरतरी राहत नाही. शरीराचे तापमान घटू शकते. मलावरोध होऊ शकतो. पचनाच्या तक्रारी निर्माण होतात आणि शेवटी डिप्रेशनचे बळी ठरण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment