निलेश राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका


मुंबई: सध्या राज्यात मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून टोकाचे वितुष्ट निर्माण झालेल्या शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखीनच रुंदावण्याची शक्यता असून भाजपने शिवसेनेच्या विरोधानंतरही पावन करुन घेतलेल्या राणे कुटुंबीयांतील व्यक्तींकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दांत टीका करण्यात आली आहे.

नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून त्यांनी यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. निलेश यांनी एकेरी शब्दात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना संबोधले आहे. संजय राऊत यांच्याकडे टीव्ही आणि लाईट बिलाचे पैसे नाहीत म्हणून ते शरद पवार यांच्याकडे पत्रकार परिषद पाहायला जातात. तर शाळेतील लहान मुलासारखे उद्धव ठाकरे हे वागत आहेत. त्यांना खोटारडे म्हटल्यावर वाईट वाटले, कोणीतरी बिचाऱ्यांना कॅडबरी द्या, अशी खोचक टीका निलेश यांनी केल्यामुळे शिवसेना आता आणखी चवताळण्याची शक्यता आहे. तसेच राणे कुटुंबाला उद्धव ठाकरे कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात राणे कुटुंबाला आपल्या धारदार जीभांना लगाम घालण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. फडणवीसांचा हा सल्ला कणकवली मतदारसंघातील भाजप उमेदवार नितेश राणे यांनी ऐकला होता. पण, नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश यांनी शिवसेनेवर टीका करणे सुरुच ठेवले होते. कणकवलीतून विधानसभा निवडणुकीत निलेश राणे विजयी झाल्यानंतर अत्यंत कडवट शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. वांद्र्याचा कवठ्यामहाकाळ कणकवलीत आल्यामुळे निलेश यांची २० हजार मते वाढली, असे निलेश राणेंनी म्हटले होते.

Leave a Comment