‘गुगल सर्च’च्या ट्रेंडिगमध्ये शरद पवार अव्वल स्थानी


मुंबई – गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर ‘गुगल सर्च’मध्ये देशभर ट्रेंडिगमध्ये असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी ‘गुगल’वर माहिती शोधली आहे.

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. शरद पवार यांच्याबद्दल त्या दिवशी ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च करण्यात आले. शरद पवार यांनी निवडणुकीच्या काळात झंजावाती प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात जान आणली. त्यांनी सातारा येथे पावसात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरुण वर्गाने पवार यांच्या सभांना मोठा प्रतिसाद दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढल्या. ‘गुगल’ सर्चमध्येही या सर्व घडामोडींचे प्रतिबिंब पडलेले पाहायला मिळत असल्यामुळेच निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल सर्वाधिक प्रमाणात सर्च झाल्याचे दिसते. तेव्हापासून आतापर्यंत शरद पवार सातत्याने गुगल सर्चच्या ट्रेंडिंगमध्ये असल्याचे ‘गुगल ट्रेंड’च्या माहितीवरून दिसते.

‘गुगल ट्रेंड’ची आकडेवारी ‘गुगल सर्च’, ‘गुगल न्यूज’ आणि ‘यूट्यूब’ यांच्या एकत्रित सर्चवरून उपलब्ध होत असते. ९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ‘गुगल ट्रेंड’वर शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांबद्दल तुलनात्मक ट्रेंड पाहिले असता ही माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर पक्षाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्रमकपणे मांडली. त्यांच्या वृत्तवाहिन्यांवरील प्रतिक्रिया चर्चात राहिल्या. ‘गुगल ट्रेंड’मध्येही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या काळातील ट्रेंड पाहिले असता संजय राऊत यांच्याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च झाल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक सर्च ३ नोव्हेंबरला संजय राऊत यांच्याबद्दल झाल्याचे दिसून येते. यामध्ये ‘संजय राऊत न्यूज’, ‘संजय राऊत ट्विटर’ यासारखे सर्च नेटिझन्सनी केले आहेत.

Leave a Comment