पुणे: ड्राय डेच्या दिवशी ‘ऑनलाईन’ दारू पडली 50 हजार 778 रुपयांना


पुणे – शनिवारी (9 नोव्हेंबर) ऑनलाईन दारू मागवणे पुण्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान काल रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. पुण्यासह देशभरात या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला होता. पण याबाबत माहिती नसलेल्या एका व्यक्तीला दारू मिळाली नाही पण त्याचबरोबर त्याला सुमारे 50 हजार 778 रूपयांचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून गंडा पडला आहे. संबंधित व्यक्तीने सध्या याप्रकरणी हिंजवडी पोलिसास्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे.

शनिवारची सुट्टी असल्याने बावधन येथे राहणार्‍या 32 वर्षीय पियाली दुलालकर यांनी ऑनलाईन माध्यमातून दारू ऑर्डर केली. पियाली यांच्या मोबाईलवर या ऑनलाईन व्यवहारामध्ये मेसेजच्या माध्यमातून एक ओटीपी आला. पण हा ओटीपी नेमका कशाचा होता हे न बघता त्यांनी तो अनोळखी व्यक्तीला शेअर केला आणि त्यांच्या अकाऊंटमधून 50 हजाराहून अधिक रूपयांची रक्कम कापली गेली.

ऑनलाईन वाईन आणि बिअर खरेदी करण्यासाठी पियाली यांनी घुले वाईन शॉपच्या मोबाईल नंबरवर फोन केला, तेव्हा शॉप ‘ड्राय डे’ असल्याने बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण त्यांनी ऑनलाईन खरेदी केल्यास घरपोच पाठवली जाईल असे पियाली यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांना एक ओटीपी आला. पण हा ओटीपी नेमका कशाचा आहे हे न पाहता त्यांनी तो शेअर केला आणि काही वेळातच त्यांच्या अकाऊंटमधून 31,777 व 19001 अशी दोन ट्रान्झॅक्शन झाली आणि क्षणात 50 हजाराहून अधिकचा फटका बसला.

Leave a Comment