राज्यपाल कोश्यारींचे सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण


मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण दिले आहे. भाजप हाच विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी त्यांना विचारणा केली आहे. देवेंद्र फडणवीस सोमवारी 11 नोव्हेंबरला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेविषयी निर्णय कळविणार आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना सत्ता स्थापनेसाठी विचारले आहे.

दरम्यान यापूर्वी राज्यपालांची भेट भाजपच्या नेत्यांनी घेतली होती, त्यावेळी बहुमत असल्याशिवाय आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यपालांनी आता सत्ता स्थापनेबद्दल विचारणा केल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजप हा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत. भाजपने यापूर्वी 2014 मध्येही अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. यानंतर सभागृहातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. पण शिवसेनेने यंदा मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून ताठऱ भूमिका घेतल्याने भाजपची गोची झाली असल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला नव्हता. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी अस्पष्टता निर्माण झाली होती.

Leave a Comment